ओबीसींची संख्या मोठी असून चालत नाही, जागृती हवी -प्रा. श्रावण देवरे

0
13

लातूर ,दि.26: केवळ संख्या मोठी असून चालत नाही तर वैचारिक जागृती सुध्दा असावी लागते. बावन्न टक्के ओबीसी आता मोठ्या प्रमाणात जागृत होत असून त्यांचे राजकीय परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे ओबीसी जातीतील माणसे प्रधानमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर काम करीत आहेत.परंतु सामाजिक जागृती नसल्यामुळे आपल्याला आपले हक्क सुध्दा मिळत नाहीत. जागृत व संघटित झाल्याशिवाय आपल्याला ओबीसींचे हक्क मिळणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रा.श्रावण देवरे यांनी केले. ते शांताई सभागृहात आयोजित लातूर जिल्हा ओबीसी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

धुळे येथे ९ व १० सप्टेंबर २०१७ रोजी दोन दिवसाची ‘राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या प्रचार-प्रसासाठी हा जिल्हा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय क्षिरसागर व कार्याध्यक्षपदी वामन अंकुश यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी सूळ, राजपाल भंडे, सुभाष निंबाळकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. मेळाव्याचे सुत्रसंचलन एनजी माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन भारत काळे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय क्षिरसागर, वामन अंकुश, दत्ता माळी, सचिन भोसले, चांगदेव माळी, अरविंद कांबळे, किशन आरसुडे, अॅड. पौळकर, धनराज माने, दत्ता सुरवसे यांनी परिश्रम घेतले.