सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांचे महत्वपूर्ण योगदान- राजकुमार बडोले

0
12

गोंदिया,दि.२७ : देशाच्या व्यवस्थेला बदलविण्याच्या कामात त्याकाळी महाराष्ट्र अग्रेसर होता. फुले-शाहू-आंबेडकरांनी त्यावेळीच सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात त्यांच्या करवीर संस्थानातून केली. मागास व वंचित घटकातील लोक शिकून पुढे गेले पाहिजे ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्याकाळात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यात शाहू मजाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिले. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
२६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण विभाग कार्यालय गोंदियाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, जि.प.पशू व कृषि समिती सभापती छाया दसरे, जि.प.माजी सभापती सविता पुराम यांची उपस्थिती होती.
उपेक्षित घटकाचा विकास करण्याचा संकल्प असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, २०१९ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे काम करण्यात येईल. मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका तयार करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न, जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रश्न सोडविण्यात येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्योजकता विकास योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकातील युवकांना उद्योजक बनविण्यात येईल. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यावर्षी १४ विद्यार्थ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. पुढच्या वर्षी २५ विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जातील असा विश्वास श्री.बडोले यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार पुराम म्हणाले, शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे अत्यंत मौल्यवान दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केल्यामुळे वंचित घटकातील व्यक्तींना चांगल्या पदावर जाता आले. आरक्षणामुळे सामाजिक प्रगती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, समाज कल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्षारोपण करतांना भारतीय वृक्षांची लागवड करावी. ज्यामुळे वन्यप्राणी पक्षांचे रक्षण करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाज कल्याण समिती सभापती श्री.वडगाये यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सामाजिक न्याय भवन परिसरात पालकमंत्री यांचे आगमन होताच त्यांनी एक वर्ष पूर्ण केलेल्या ७०० झाडांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. सामाजिक न्याय दिनानिमित्त नागपूर विभागातील आश्रम शाळेतील व वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा, जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन सन २०१७ मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र, दिव्यांग विवाहीत जोडप्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला नागपूर विभागातील समाज कल्याण विभागाअंतर्गत येत असलेले विविध आश्रमशाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त श्री.वानखेडे यांनी केले. संचालन प्रा.रजनी गायधने यांनी केले, उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी संभाजी पोवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याण निरीक्षक अंकुश केदार यांच्यासह सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील व जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.