विदर्भातील खासदारांचा राजीनामा मागणार-राम नेवले

0
8

पवनी,दि.14: भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे दिलेले आश्वासन तीन वर्ष उलटूनही पाळले नाही. त्यामुळे भाजपा सरकार चलेजाव या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भातील खासदारांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे मुख्य नियंत्रक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेली चार वर्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती लढा देत आहे. भाजपा सरकार मागणीला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे क्रांती दिनापासून ९ आॅगस्ट आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथील विदर्भ चंडीकेची पुजा करून विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानी मोर्चा नेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे, असे विचार समितीचे मुख्य नियंत्रक राम नेवले यांनी व्यक्त केले. विदर्भ स्वयंपूर्ण आहे. राज्य निर्मिती झाल्यास येथील शेतकरी सुखी होईल त्यांचे डोक्यावर कर्जाचा बोझा नसेल. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध होईल. विदर्भात वीज, वनसंपत्ती व सिंचन उपलब्ध असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षमता आहे.लहान राज्य सुखी राज्य ही संकल्पना वास्तवात उतरविण्यासाठी विदर्भ राज्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, कोअर कमेटी सदस्य विष्णू आष्टीकर, अर्जून सुर्यवंशी, माजी प्राचार्य के.एम. नान्हे, युवा आघाडी अध्यक्ष तुषार हट्टेवार, जिल्हा मत्स्य उत्पादक सह संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, डॉ. विक्रम राखडे, नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, दामोधर क्षीरसागर, बंडू रामटेके, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. सुनिल जीवनतारे, मनोज शेंडे, फागो दिघोरे, धनराज नागपूरे, रमेश शिवरकर व समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.