नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कोरचीची बाजारपेठ शंभरटक्के बंद

0
8

गडचिरोली,दि.२८: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या आजच्या पहिल्याच दिवशी कोरची येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. दुर्गम भागातील वाहतूकही ठप्प होती.
दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या कालावधीत ते ठार झालेल्या नक्षल्यांचे स्मारक उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. त्यासाठी नक्षली ठिकठिकाणी बॅनर लावून लोकांना शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करतात. सप्ताहादरम्यान नक्षलवादी हिंसक कृत्य करण्याची भीती असल्याने नागरिक धास्तावतात. याच भीतीने आज कोरची या तालुकास्थळावरील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. धानोरा, भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील वाहतूकही ठप्प राहिल्याने कर्मचारी व नागरिकांची गैरसोय झाली. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनूचित घटना घडली नाही. हा सप्ताह ३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.