हवाई सुंदरी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळा पुर्व विदर्भातील २१३ युवतींचा सहभाग

0
35

गोंदिया,दि.२९ : पुर्व विदर्भातील मुली हया हवाई सुंदरी होणे हे पुर्वी स्वप्नच होते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुलींच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला. या होतकरु मुलींना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम बार्टी करीत आहे. मुलींनी आता हवाई सुंदरीचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.२९ जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे च्या वतीने आयोजित एअर इंडियातील हवाई सुंदरी (केबीन क्रु) च्या ४०० रिक्त जागांकरीता मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेचे उदघाटक म्हणून श्री.बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुमरे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर, राजेश कठाणे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेव कापगते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एअर इंडियाचे केबीन क्रु प्रशिक्षक हेमंत सुटे, आशुतोष नगराळे, स्टेफी निकोलस यांची उपस्थिती होती.
हवाई सुंदरीच्या या मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील २१३ युवती उपस्थित होत्या. एअर इंडियाचे हवाई सुंदरी (केबीन क्रु) प्रशिक्षक हेमंत सुटे, आशुतोष नगराळे, स्टेफी निकोलस, श्रीकांत राऊत, नेहा जवादे व कुणाल चौकीकर यांनी उपस्थित युवतींची मुलाखत, संवाद कौशल्य चाचणी, शिक्षण, उंची व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे तपासली. या कार्यशाळेतून ६० युवतींची निवड हवाई सुंदरी पुर्वतयारी प्रशिक्षणासाठी केली. पुर्वतयारीसाठी त्यांना आता लेखी परीक्षा, प्रश्नावली, गटचर्चा, वैद्यकीय तपासणीची तयारी करावी लागणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून निवड झालेल्या गोंदिया येथील मोहिनी मेश्राम व भंडारा येथील द्विपल बिसने या युवतींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी या युवतींनी कठोर परिश्रमातून आपण हे यश मिळविल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने युवती उपस्थित होत्या. प्रास्ताविक देवसूदन धारगावे यांनी तर संचालन प्रा.किशोर शंभरकर यांनी, तर उपस्थित युवतींचे आभार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी मनोगतातून मानले.