बलशाली भारताच्या निर्मितीची ज्योत चिमूरमधून पेटू द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
17

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय निर्मितीची घोषणा

चिमूर,दि.17 : 1942 च्या चलेजाव आंदोलनानंतर भारतामध्ये चिमूरने स्वातंत्र्याची ज्योत पेटविली होती. तेव्हा इंग्रजाविरुद्ध लढून त्यांना हद्दपार करण्याची लढाई आम्ही जिंकलो आहे. आता चिमूर मधून बलशाली नव भारताच्या निर्मितीची ज्योत पेटवू या असे भावपूर्ण आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शहिदांना आदरांजली व्यक्त केल्यानंतर लाखोंच्या जनसमुदायाला येथील बीपीएड महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी संबोधित केले.सभेपूर्वी त्यांनी चिमूर येथील शासकीय हुतात्मा शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर किल्ला परिसर येथे चिमूर शहिदांच्या स्मृतीस श्रध्दांजली पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी अर्थ नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वन राज्यमंत्री राजेअंबरिशराव आत्राम, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चांदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडीया,आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, आयोजक आमदार किर्तीकुमार भांगडीया, विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आमदार अतुल देशकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
चिमूर जिल्ह्याच्या प्रलंबित मागणीचा अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. तो धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील प्रलंबित जिल्ह्याच्या मागणीसाठी एक समिती काम करत आहे. या समितीच्या शिफारशी नंतर सर्व नव्या जिल्ह्यासोबत चिमूर जिल्ह्याची घोषणा केली जाईल.तथापि आजचा क्रांती मेळावा आयोजित करणारे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय निर्मितीची आज आपण घोषणा करत असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्मित चिमूर आणि नागभीड नगर पालिकांना भरघोस आर्थिक मदत केली जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. याशिवाय स्व. गोटूलाल भांगडीया स्मृती रुग्णालय निर्माण केल्याबद्दल त्यांनी भांगडीया परिवाराचे अभिनंदन केले.सोबतच मोखा नाला या ठिकाणच्या साडेसात हजार हेक्टर शेतीचे सिंचन करणाऱ्या सूक्ष्म सिंचन प्रकल्पाला मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून चिमूरसह विदर्भातील प्रलंबित प्रकल्पनांना तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे सुतोवाच केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते व आमदार मितेश भांगडीया यांची भाषणे झाली. प्रास्ताविक आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी चिमूर जिल्हा निर्मितीची तसेच नव्या नगर पालिकांना निधीची मागणी केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वतंत्र संग्राम सैनिकांच्या वारसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत आरवे व रेणुका देशकर यांनी केले.