चिचगड ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची प्रधानमंत्र्यांनी घेतली दखल

0
41

राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे पत्र

चिचगड,०३(सुभाष सोनवाने)- गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील आदिवासी, मागास आणि नक्षलग्रस्त भागातील चिचगडच्या ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांची दखल प्रधानमंत्र्यांनी घेतली असून त्या गैरव्यवहारांची तत्काळ चौकशी करण्याविषयीचे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहे. परिणामी, जिल्ह्यातील प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली आहे. उल्लेखनीय म्हणजे या विषयीचे वृत्त सर्वप्रथम साप्ताहिक बेरारटाईम्सने आपल्या २६ जुलैच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे विशेष.
सविस्तर असे की, गेल्या काही वर्षापासून चिचगड ग्रामपंचायतीला गैरव्यवहाराचे ग्रहण लागले होते. या संदर्भात नागरिकांची ओरड असताना सुद्धा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्राम विकास अधिकारी आणि प्रशासन हे सातत्याने केराची टोपली दाखवीत होते. सर्वप्रथम साप्ताहिक बेरारटाईम्सने आपल्या २६ जुलैच्या अंकात या प्रकरणाला वाचा फोडली. चिचगड ग्रामपंचायतीमध्ये दुकान गाळे बांधकाम व वाटपात मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. याशिवाय बेरार टाईम्सने आपल्या दुसèया अंकात चिचगड ग्रामपंचायतीतील घरकुल व शौचालय घोटाळ्यावर प्रकाश टाकला होता.
या दोन्ही प्रकरणी नागरिकांनी चिचगड ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहारासंबंधाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लेखी तक्रार सुद्धा केली होती. यामध्ये वरील दोन प्रकरणासह गावात भातगिरणीमुळे होणाèया प्रदुषणाविरुद्ध ३१ जानेवारी २०१४ ग्रामसभेत केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न केल्याबाबत आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून कोल्लासूर तलावाचे खोलीकरणादरम्यान निघालेले मुरूम खासगी शेतकèयाच्या शेतात टाकले असताना गावात टाकल्याचे दाखवून खोट्या देयकाची उचल करणे आदी प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ग्रामविस्तार अधिकारी रत्नाकर घरत यांच्या ११ वर्षाच्या कार्यकाळातील सर्व व्यवहाराच्या चौकशीची मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशीचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. परिणामी, स्थानिक प्रशासन चांगलेच हादरले आहेत.