पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व्हावे!-आ.देशमुख

0
9

नागपूर,दि.05 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद हे महिलेच्या हातात दिले आहे. महिला सक्षमीकरणाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर बहुजन समाजातून आलेल्या पंकजा मुंडे या भविष्यात प्रगतीशील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी श्रीगणेशाकडे सदिच्छा व्यक्त करतो, असे विधान काटोलचे भाजपा आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सोमवारी केले.
काटोल फेस्टिव्हलमध्ये आयोजित महिला मेळाव्यासाठी ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आल्या होत्या. त्याप्रसंगी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, पंकजा मुंडे या पहिल्या बहुजन मुख्यमंत्री होण्यासाठी गणरायाला प्रार्थना करतो, असे विधान आ. देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करीत केंद्रात निर्मला सीतारामन या संरक्षणमंत्री झाल्या. ही अतिशय भूषणावह बाब असल्याचे सांगितले. हाच धागा पुढे नेत आशिष देशमुख यांनी उपरोक्त विधान केले.
यावेळी पंकजा मुंडे यांनी महिला सक्षमीकरणावर भाष्य केले. महिलांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. महिलांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, उपसभापती योगेश चाफले यांची प्रमुख उपस्थिती होती.