पुनर्वसित आदिवासी मेळघाटात मुलाबाळांसह परतले

0
20

चिखलदरा, दि. 9 –  पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले. संबंधित अधिका-यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने व कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त आदिवासींनी शेकडो पोलीस, कमांडो आणि वनकर्मचा-यांचा ताफा भेदत कूच केले. आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा इशारा दिल्याने शनिवारी व्याघ्र प्रकल्पात अलर्ट जारी करण्यात आला होता. खटकाली, झरी, तलई, अमोना, ढाकणा हे सर्व गेट सील करण्यात आले होते. व्याघ्र प्रकल्पाचे अतीजलद दल, कमांडो, पोलीस, वनकर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात होता. तरीही हा चक्रव्यूह भेदून आदिवासी महिलांनी गेटचे कुलूप फोडून दुपारी ३ वाजता आत प्रवेश केला.

तालुक्यातील सोमठाणा खुर्द, अमोना नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, धारगढ व बारूखेडा येथील आदिवासींचे व्याघ्र प्रकल्पाच्या अतीसंरक्षित क्षेत्रातून सन २०११ ते २०१५ मध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसित वस्ती सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने शिवाय वैद्यकीय सुविधादेखील न मिळाल्याने तब्बल २२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे भयावह आकडे आहेत. आदिवासींच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मूळ गावी परतण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी त्यांनी मूळ गावांकडे धाव घेतली.