अंगणवाडी कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संप उद्यापासून

0
13

गोंदिया,दि.10-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे ११ सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येत असून याअंतर्गत महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदा व मंत्री आणि आमदारांच्या कार्यालय व निवासस्थानासमोर मोर्चे आणि धरणे देण्यात येणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातही अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती हौसलाल रहागंडाले यांनी दिली आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि भत्ते निश्‍चित करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली होती. या समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. मात्र सरकारने तो अद्याप मंजूर केलेला नाही. राज्याच्या बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्‍वासनाला पाच महिन्याचा कालावधी लोटला तरीही यासंदर्भात निर्णय झालेला नाही. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही यांसदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दाखवली. मात्र फाईल त्यांच्याच टेबलावर पडून आहे. केंद्रीय मंत्री जेटली यांनीही अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबद्दल सकारात्मकता दाखविली. मात्र, निधीत १५00 कोटींची कपात केली.
सरकारची अंगणवाडी सेविकाविरोधी धोरण लक्षात घेता अंगणवाडी सेविकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. १९ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका सरकारला कोणताही अहवाल न पाठवून सरकारविरुध्द असहकार करणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार मानधन, शिक्षित अंगणवाडी सेविकांना मानवात वाढ, मानधनाच्या १0 टक्के दरवर्षी मानधनवाढ, प्रवाशी भत्ता ३ हजार रुपए, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या तुलनेत मदतनीसांना ७५ टक्के मानधन देण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप असल्याचे त्यांनी सांगितले.