उत्कृष्ट ग्रंथालय व ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार २० सप्टेबरपर्यंत अर्ज आमंत्रित

0
66

गोंदिया,दि.११ : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा व त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये ५० हजार, ३० हजार, २० हजार, १० हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह सन्मानपूर्वक देवून सन्मानीत करण्यात येते.
राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येते.
सन २०१७-१८ च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज २० सप्टेबर २०१७ पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.पं.ढोणे यांनी कळविले आहे.