स्वाईन फ्ल्यूबाबत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा

0
25

गोंदिया,दि.१३ : स्वाईन फ्ल्यू या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता १२ सप्टेबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, डॉ.संजय अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ.पातुरकर यांनी पॉवर पाईंट प्रेझेन्टेशनद्वारे स्वाईन फ्ल्यू या आजाराबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, नागरिकांनी या आजाराबाबत खबरदारीचे पालन करावे. खोकलतांना किंवा शिंकतांना तोंडावर रुमाल ठेवावा. रोगी व्यक्तीने वापरलेले रुमाल, टॉवेल, कपडे आदींचा वापर करु नये. साबण व पाण्याचा वापर करुन वारंवार हात धुवावे. ताप, सर्दी, खोकला यासारखे लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्दी, खोकल्याचा संसर्ग झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जावू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यशाळेस डॉ.घनश्याम तुरकर, डॉ.पदमीनी तुरकर, डॉ.लता जैन, डॉ.ममता सरोते, डॉ.पी.ए.कारडा, डॉ.बी.डी.बग्गा, डॉ.निलेश जैन, डॉ.शिरीष रत्नपारखी, डॉ.शिबू आचार्य यांच्यासह अन्य डॉक्टर्स उपस्थित होते.