राष्ट्रीय हरित लवादाने दिला तेलंगणा सरकारला धक्का

0
13

आल्लापली(सुचित जम्बोजवार),दि.७ : राज्याच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर गोदावरी नदीवर तेलंगणा सरकार बांधत असलेला मेडीगट्टा महाकाय सिंचन प्रकल्प गेली काही वर्षे वादाचा विषय ठरला होता. राष्ट्रीय हरित लवादाने ताज्या आदेशान्वये या प्रकल्पाला स्थगिती दिल्याने तेलंगणा सरकारसाठी हा एक धक्का मानला जात आहे. महाराष्ट्राला अल्प लाभ होणार असल्याने स्थानिक या प्रकल्पाचा सतत विरोध करत होते. प्रकल्प स्थगित झाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
मेडीगट्टा कालेश्वर महाबंधारा प्रकल्पाचे महाराष्ट्र- तेलंगाणा सीमेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते २ मे २०१६ रोजी भुमिपुजन झाले. त्याच वेळेस सिरोंचा येथील शेतकरी आणि विरोधी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत या प्रकल्पाला विरोध केला होता. गडचिरोलीची तेलंगणा सीमा म्हणजे गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या पलीकडे तेलंगणात या प्रकल्पाविषयी उत्साह होता मात्र महाराष्ट्रातील शेतकरी दहशतीत होता. प्रत्यक्ष बांधकामाचे भुमिपुजन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याने महाराष्ट्रातील पंचवीस गावे बुडवणा-या या प्रकल्पावरुन तेलंगाणा सरकारने महाराष्ट्र सरकारची दिशाभुल केल्याचे बोलले जात होते. तेलंगणा सरकारने महाराष्ट्राची दिशाभूल करत प्रकल्प पुढे रेटला मात्र या भागातील पर्यावरणाची , जंगलाची हानी होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी आवश्यक होती. ही सुनावणी लवादापुढे जारी होती. त्यावर निर्णय झाला असून तेलंगणा सरकारने अपुरी माहिती सादर केल्याच्या कारणावरून राष्ट्रीय हरित लवादाने हा प्रकल्प स्थगित केला आहे. हा निर्णय जाहीर होताच या भागातील स्थानिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
आविस ने सिरोंचात या निर्णयाचे स्वागत करीत आविसचे विदर्भ नेतृत्व आणि अहेरीचें माजी आमदार दीपक दादा आत्राम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम, जिल्हा परिषद सदस्या अनिताताई आत्राम, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे सह आविस च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिरोंचा शहरात भव्य रॅली काढून निर्णयाचे स्वागत करीत फटाके फोडून जल्लोष साजरा केले. या रॅलीत शेकडो शेतकरी सह आविस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.