काँग्रेसने मुलचेऱ्यात केला चक्का जाम

0
19

मुलचेरा, दि..७: तालुका निर्मितीला २५ वर्षे होऊनही शासन व प्रशासनाने मुलभूत सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा यांच्या नेतृत्वात गणेशनगर फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

मुलेचरा तालुक्याने यंदा आपल्या निर्मितीचे रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. परंतु मागील २५ वर्षात शासनाने येथे कुठल्याही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. पूर्ण विकास झाला नाही. मुलचेरा ते आलापल्ली, आष्टी, घोटृ, बोलेपल्ली हे चार मार्ग व अन्य रस्ते उखडले असून, आवागमन करताना नागरिकांची दमछाक होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कमी दाबाच्या विजेमुळे संपूर्ण तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरु असतो. त्यामुळे दुष्काळाच्या काळात वीजपंप असूनही अनेक शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे. गणेशनगर ते वेलगूर या लांब पल्ल्याच्या वीज जोडणीची समस्या अनेक दिवसांपासून आवासून उभी आहे.  शेकडो नागरिक वनहक्क पट्ट्यांपासून वंचित आहेत. पेट्रोल, डिझेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गोरगरिबांना जीवन जगणे असह्य झाले आहे. रस्ते, वीज व अन्य समस्या सोडवून दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी आज पहाटे पाच वाजतापासून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, उमेश कडते यांच्या नेतृत्वात मुलचेऱ्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी तीन वर्षाच्या कार्यकाळात कुठलीच विकास कामे केली नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही रवींद्र शहा यांनी केली आहे.