शिवशाही बससेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी – परिवहन मंत्री रावते

0
7

भंडारा,दि. 7 :- खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता, त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलित शिवशाही बस सेवा भंडारा- नागपूर-भंडारा सुरु केली आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळून सुविधायुक्त व आरामदायी प्रवास करण्याची सेवा मिळणार आहे. विदर्भात नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या या सेवेचा शुभारंभ भंडारा आगारातून होत आहे ही भंडारावासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे राज्याचे परिवन मंत्री दिवाकर रावते सांगितले. शिवशाही वातानुकूलित बससेवाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, विभाग नियंत्रक श्री. नागुलवार,सहाय्यक वाहतुक अधिक्षक एस.पी. लिमजे उपस्थित होते.
प्रारंभी खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिवशाही बससेवेचा शुभारंभ फित कापून करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसची पाहणी करुन वातानुकूलित सुविधा व इतर बाबींची पाहणी केली.
या शिवशाही बससेवेमुळे फक्त 1 तासात नागपूर ते भंडारा दरम्यानचा प्रवास होणार असून ही सेवा निमआराम असून ही बस विना वाहक असणार आहे. याच धर्तीवर राज्यात सर्वत्र 100 बसेस धावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही सेवा कोणत्याही स्पर्धेत टिकणार आहे. या बस मध्ये सी.सी.टि.व्ही कॅमेरा, वायफाय सेवा अंतभूत असून आरामदायी अशी ही सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. भविष्यात या सेवेकडे प्रवाशांचे प्रमाण वाढणार आहे. आगार परिसरात सि.सी.टि.व्ही कॅमेरे लावण्याच्या कामास सुरुवात होणार असून यामुळे होणाऱ्या चोरी व लुबाडणूकीच्या प्रकरणास आळा बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आगारात कार्यरत करुणा गोंडाणे या वाहकाने धैर्य व समयसुचकतेने अलिमूर शेख या महिलेची प्रसूती केली. तीच्या या कार्याने परिवहन महामंडळाची मान उंचावली असून त्या कार्याबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते तीचा शाल श्रीफळ शिल्ड देवून सत्कार करण्यात आला.