महानगरपालिकेच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात मोर्चा

0
8

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या पूरबुडित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना महानगरपालिकेने नोटीस बजावून घरे खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

इरई व झरपट नदीच्या काठावर असलेल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, गोपालपुरी, ठक्कर कॉलनी, ओंकारनगर, हवेली गार्डन, इंदिरानगर, विठ्ठलमंदिर वॉर्ड, झरपट वॉर्ड, नगिनाबाग येथील सुमारे पाच हजार कुटुंबांना महानगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी येऊन नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. त्यामुळे नागरिकांनी एका महिन्याच्या आत घर खाली करावे व अवैध बांधकाम तोडून टाकावे, असे सदर नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी असे न केल्यास महापालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये दिला आहे.

मात्र अवैध बांधकामाच्या नावावर घरे पाडण्याचा हा मनपाचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे मनपाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात येथील आझाद बागेमधून दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला.

शहराच्या प्रमुख मार्गाने फिरून मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वैद्य, बी.बी. उईके, ज्योती रंगारी, डी.के. आरीकर, सिराज खान, बापू अन्सारी, विठ्ठल आडराने, जाकीर शेख, महेश बोडखे, संजय निंबाळकर, रमेश चहारे, सिराज खान, संदिप जयस्वाल, अनुभाई ईसाराईल, लतीफ अंडेवाले, संजय निंबाळकर, राज गहेरे, सत्तर हुसेन, महेश बोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ुजिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले.