अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ बंद

0
4

नागपूर,दि.12- वेगळा विदर्भ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे करीत, विदर्भ राज्य आंदोलन समितीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी येत्या ११ डिसेंबर रोजी ‘विदर्भ बंद’ची हाक दिली आहे.
‘वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप नेते आता मौनीबाबा झाले आहेत. विदर्भात बेरोजगारी वाढत असताना त्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तर, दुसरीकडे शेतमालाचे भाव पडत आहेत. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. नोटबंदीनंतर असंख्य लहान उद्योग बंद झाले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली. या सर्व प्रश्नांचे उत्तर वेगळ्या राज्यात असल्याने ११ डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येत आहे’, असा निर्णय समितीने अमरावती येथे झालेल्या बैठकीत घेतला. समितीचे नेते अॅड. वामनराव चटप अध्यक्षस्थानी होते.
केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बंद पाळण्यात येईल. बंददरम्यान हिंसाचार किंवा कुठेही गडबड होऊ नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. हॉस्पिटल्ससारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्यांना कुणीही विरोध करू नये, अशी सूचनाही कार्यकर्त्यांना केली असल्याचे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.पत्रपरिषदेत प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, अरविंद देशमुख, अॅड. नंदा पराते, राजू नागुलवार, डॉ. गजराज हटेवार, मुकेश मसुरकर, राजू काळे, विष्णुपंत आष्टीकर, श्याम दंडारे, प्रभाकर काळे, श्याम वाघ, सारंग कामोझलवार, अक्षय कोसे आदी उपस्थित होते.