25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करा-खा. प्रफुल पटेल

पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करा-खा. प्रफुल पटेल

0
30

सिहोरा : जिल्ह्यात अन्य कार्यकर्ते तथा पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. यामुळे जुने आणि नवीन अशी समज दूर ठेवण्याची गरज आहे. घरा घरात पक्षाची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी भर दिला पाहिजे. पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले.
गुरूदेव मंगल कार्यालय सिहोरा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे होते तर व्यासपीठावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, आ. राजेंद्र जैन, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, मधुकर सांभारे, धनेंद्र तुमसर, प्रेरणा तुरकर, रामदयाल पारधी, जितेंद्र तुरकर, किशोर रहांगडाले, राजेंद्र ढबाले, विजय डेकाटे, गजानन लांडोवार, छगण पारधी, नरेंद्र ठाकरे उपस्थित होते. खा. पटेल पुढे म्हणाले, जिल्ह्यात विकसाची गंगा खेचून आणली आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाली आहेत. सिहोरा परिसरात चांदपुर पर्यटन स्थळाचा विकास महाराष्ट्र टुरिझम महामंडळ करणार असल्याने रोजगाराची साधने निर्माण होणार आहेत. तिरोडा आणि सिहोर्‍याला धरण बांधकामाने जोडले आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे समस्या निकाली काढण्यात आली आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
नुकतेच नक्षलग्रस्त यादीतून जिल्ह्याला वगळण्यात आल्याने विकास निधी प्रभावित होणार असल्याची राज्य शासनावर टीका केली. सिहोरा परिसरात धरणाचे बांधकाम झाल्याने शेतकर्‍यांना वाढणारी पाण्याची पातळी संजीवनी ठरत आहे. विहिरीत जलसाठा वाढलेला आहे. मेळाव्यात माजी जि.प. सदस्य चंदु तुरकर यांच्या नेतृत्वात २00 कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याशिवाय देवसर्रा, बपेरा, चुल्हाड, मुरली, रनेरा, दावेझरी, सिहोरा, सिंदपुरी आदी गावातील आजी माजी अन्य पक्षाचे कार्यकर्ते यांनी राकाँत प्रवेश केल्याने खा. पटेल यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात मनिषा नागलवाडे, विठ्ठल कहालकर, रत्नाकर वासनिक, उमेश तुरकर, दिलीप ढबाले, संतोष ठाकरे, शाम भैरम, उमेश्‍वर कटरे, राजकुमार माटे, क्रिष्णा बनकर उपस्थित होते. मेळाव्याचे संचालन अरविंद राऊत यांनी केले. समारोप देशभक्ती गिताने करण्यात आली.