‘त्या’ वाघिणीचा मारोडा – जामगिरी जंगलात आढळला मृतदेह

0
9

गडचिरोली,दि. ३: जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या तसेच दोन नागरीकांसह जनावरांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ वाघीणीचा चामोर्शी तालुक्यातील येणापूर परिसरातील मारोडा – जामगिरी जंगल परिसरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर वाघिणीच्या मृतदेहाजवळच एका डुक्कराचाही मृतदेह आढळून आला आहे. इलेक्ट्रिक शॉक लागून सादर वाघिणीचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात असले तरी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही परिपूर्ण माहिती दिली नसल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर वाघिणीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती कळू शकली नाही.
सदर वाघिणीने आरमोरी तालुक्यासह देसाईगंज परिसरात दहशत निर्माण केली होती. सदर वाघिणीने त्या भागात दोन नागरीकांसह अनेक जनावरांवर हल्ला करुन त्यांचे बळी घेतले होते. त्यानंतर वनविभागाने सदर वाघिणीला जेरबंद करुन चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले होते. मात्र सदर वाघिणीने चपराळा अभयारण्य सोडून परिसरातील शेत शिवारांमध्ये वावर वाढला होता. यामुळे तालुक्यांतर्गत येत असलेल्या येणापूर परिसरात वाघीणीने धुमाकुळ घतला होता. सदर वाघिणीने या परिसरात २ ते ३ जनावरांचा बळी घेतला होता. तसेच शेत शिवारात सदर वाघिणीने धुमाकुळ घातल्यामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र आज सदर वाघिणी येणापूर परिसरातील मारोडा – जामगिरी जंगल परिसरातील शेतशिवारात मृतावस्थेत आढळून आले आहे.