सत्तेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करा – खा. नाना पटोले

0
17

आदिवासी सरपंच मेळावा
भंडारा,दि. 3 :- लोकशाहीत गावाच्या सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे. चौदाव्या वित्त आयोगात ग्रामसभेला अमर्याद अधिकार प्रदान करण्यात आले आहे. सरपंच पदाची मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत सर्वांना विश्वासात घेवून सत्तेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
आदिवासी विकास विभाग एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भंडारा यांच्या वतीने स्थानिक लक्ष्मी सभागृह येथे सरपंच मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. आमदार चरण वाघमारे, ॲड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी. तरकसे, विवेक नागभिरे, प्रभुदास सोयाम, दिनेश शेराम, श्याम कार्लेकर, अशोक उईके, बिसन सयाम, डॉ. श्याम वरखडे व जगदीश मळावी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जिल्हयात 67 गावात आदिवासी सरपंच तर 130 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. असे सांगून खासदार पटोले म्हणाले की, लोकांनी आपल्याला सेवेची संधी दिली आहे. केवळ आदिवासीच नाही तर संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. पदाच्या माध्यमातून समाजबांधवांचा विकास हा उद्देश डोळयासमोर ठेवून काम करा. शासनाच्या योजना व अंमलबजावणी या बाबीचा अभ्यास महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र व सुसज्ज ग्रंथालय उभारण्याच्या सुचना त्यांना विभागाला केल्या.
यावेळी बोलतांना आमदार चरण वाघमारे म्हणाले की, गावाच्या विकासाची जबाबदारी व संधी आपल्याला आहे. गावाच्या योजना व अर्थसंकल्प समजून घ्या. कायदे व अधिकार जाणून घ्या. ग्रामसभा कशी चालवायची याबाबत अभ्यास करा. योजनेचा निधी व ग्रामसभेचा ठराव याबाबत जागृत रहा. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घ्या. शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रचार सरपंचामार्फत व्हावा. सरपंचांनी प्रत्येक व्यक्ती पर्यंत योजनांची अंमलबजाणी करावी, अशी अपेक्षा आमदार रामचंद्र अवसरे यांनी केली.
शिका, शहाणे व्हा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग लोक कार्यासाठी करा, असा सल्ला जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला. गावात रोजगाराची संधी कशा निर्माण होतील या अनुषंगाने सरपंचांनी काम करावे. पुढील काळ हा कौशल्य विकासाचा असून तरुण आणि महिलांच्या हाताला काम देण्याचे दायित्व गावाचा कारभारी म्हणून सरपंचावर आहे. प्रतयेक विषयाचा अभ्यास करुन अधिकारी व लोकांच्या अडचणी समजून काम करावे, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी म्हणाले की, आपल्याला मिळालेल्या गावसेवेच्या संधीचे सोने करावे. शासनाच्या निर्देशाप्रमाणेच निधी खर्च करावा, असासल्ला त्यांनी दिला. सरपंचांनी अधिकाराचा योग्य वापर केल्यास गावाचे नंदनवन करण्याची संधी आहे. जिल्हा परिषद मार्फत सुध्दा सरपंचांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
शासन आणि लोकांमधील महत्वाचा दुवा सरपंच असून आदिवासी विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी., यांनी प्रास्ताविकात सांगितले. योग्य लाभार्थ्याची निवड व योजनांचा लाभ या प्रक्रियेत सरपंचांची महत्वाची भूमिका असणार आहे. सरपंचांनी ही भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात सरपंचांना माहिती व योजनांची किट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. आदिवासी विभागाच्याविविध लाभार्थ्यांना व शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचे पत्र या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. डॉ.श्रीकांत गोडबोले व संशोधन अधिकारी अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर मिलिंद नारिंगे यांनी आदिवासी विभागाच्या योजना, सरपंचाचे अधिकारी अंमलबजावणीची कार्यपध्दती याबाबत उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास आदिवासी सरपंच व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.