११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक-राम नेवले

0
7

भंडारा,दि.04ः- स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर सत्तेत आलेले केंद्र व राज्य सरकार आता यावर चकार शब्द काढत नाहीत. विदर्भात वाढलेली बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी प्रश्न भाजप सरकारमुळे निर्माण झाले असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत विदर्भ वेगळा झालाच पाहिजे. त्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला संपूर्ण विदर्भ कडकडीत बंद पाळण्यात येईल, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी आमदार अँड. आनंदराव वंजारी, मधुकर कुकडे, वासूदेवराव नेवारे, अर्जुन सुर्यवंशी, मोरेश्‍वर बोरकर, अरूण केदार, विजया धोटे, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचे सांगत राम नेवले म्हणाले, आजघडीला महाराष्ट्र राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने विदर्भाच्या चार लाख नोकर्‍या पळविल्या. एक लाख कोटींचे सिंचन पळविले. इतके वर्ष होऊनही गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोरे प्रकल्प सहा वर्षात पूर्ण होतो. राज्यावर कर्जाचा ताण वाढत असून देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते. सर्वाधिक विजेचे उत्पादन होणार्‍या विदर्भात नेहमीच काळोख पसरलेला असतो. विजेचे दर गगणाला भिडले आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास या राज्याच्या खर्‍या अर्थाने विकास होईल. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ होणे आवश्यक असल्याचे नेवले यांनी सांगितले.
११ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरात होत आहे. त्याच दिवशी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी संपूर्ण विदर्भ बंद करण्यात येईल. विदर्भातील सर्व पक्ष, व्यापारी, शेतकरी, बेरोजगार तरूण आदी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. सन २0१९ च्या निवडणुकीपुर्वी स्वतंत्र विदर्भ दिले नाही तर आंदोलन तीव्र करू, असा इशाराही नेवले यांनी दिला.