माओवादी हल्ल्यातून जवान बचावले

0
9

गडचिरोली ,दि.११- : सीआरपीएफ जवानांच्या मार्गात स्फोटके पेरून मोठा घातपात घडविण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न शुक्रवारी फसला. सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलांची कुठलीही हानी झाली नाही. भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.
शुक्रवारी सकाळी सीआरपीएफचे २० जवान दुचाकीवरून दैनंदिन गस्तीसाठी नारगुंडा पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. ठाण्यापासून काही अंतर जात नाहीत तोच रस्त्यावर पेरून ठेवलेल्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज होताच सतर्क झालेल्या जवानांनी परिसरात कसून शोधाशोध केली असता टायमर लावलेला आणखी एक क्लेमोर बॉम्ब पेरून ठेवल्याचे लक्षात आले. त्यानंतर जवानांनी हा निष्क्रिय केला. २ डिसेंबरपासून माओवाद्याचा ‘विशेष सप्ताह’ आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांकडून हिंसक कारवाया होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.