जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-आ.अग्रवाल

0
8

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकºयांची हलाखीची स्थिती व पावसाअभावी घटलेले उत्पादन बघता सरकारने गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा तसेच धानाला प्रती क्विंटल ४०० रूपये बोनस व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली आहे. यासाठी आमदार अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले.
पावसामुळे जिल्ह्यातील शेती पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे. पावसाअभावी उत्पादन घटले असून त्यात बाजारात योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांची ही स्थिती बघता आमदार अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.७) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील पूर्ण परिस्थिती मांडत रब्बी पिकांना सरकारने बोनस दिला नाही. मात्र खरिपातील पिकांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने धानाला किमान ४०० रूपये प्रती क्विंटल बोनस देण्यात यावा. तसेच पावसाअभावी प्रकल्पांत पाणी नसल्याने शेतीला पाणी देता येणार नाही. अशात जिल्ह्यात रब्बीचा हंगाम होण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या स्थितीत जिल्ह्यातील शेतकºयांना कोणत्याही अटी व नियम न लावता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीही केली.
त्याचप्रकारे, जिल्ह्यातील तीन तालुके सरकारने दुष्काळग्रस्त घोषीत केले असून यापासून शेतकºयांना काहीच दिलासा मिळाला नाही. असे असताना वीज वितरण कंपनीकडून ७ तारखेपासून कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांचे कनेक्शन कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याची स्थिती खूपच वाईट असल्याने पूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.