माजी खा.पटलेंच्या प्रयत्नाने ‘दूधाचा डब्बा’महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत

0
14

तुमसर,दि.12 : गोंदिया-कोल्हापूर या महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेगाडीत गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात आलेला ‘दूधाचा डब्बा’ माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या पुढाकाराने   रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडण्यात आल्याने दुग्ध उत्पादकांमध्ये आंनद व्यक्त केला जात आहे.याविरोधात, दूध उत्पादक किसान संघटनेकडून माजी खासदार शिशुपाल पटले यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यावर पटले यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच न्याय न मिळाल्यास पटले यांनी दूध उत्पादक शेतकºयांसोबत आंदोलनाची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, त्यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री गोयल यांना भेटून आणि मुंबई येथे उच्च अधिकाºयांना भेटून तात्काळ अन्याय दूर करण्यात यश मिळवले.
भंडारा आणि गोंदिया या दूध उत्पादक जिल्ह्यांतील किमान ५०० दूध उत्पादक शेतकरी दररोज सकाळी नागपूरला दूध वाहतूक करण्याकरिता महाराष्ट्र एक्स्प्रेस चा उपयोग करतात. नागपूरला मागणी आणि दर जास्त असल्याने शेतकरी वर्गाकरिता हा जोडधंदा ठरत आला आहे. त्यांना रेल्वे वाहतुकी दरम्यान वाईट वागणूक आणि आर्थिक पिळवणुकीचा सामना करावा लागत होता. त्याकरिता तत्कालीन लोकसभा सदस्य शिशुपाल पटले यांनी १२ वर्षांपूर्वी रेल्वे मंत्री आणि उच्च अधिकारी यांचेशी सतत पाठपुरावा करून दूध उत्पादक शेतकरी यांना या मूलभूत समस्येवर मोठा दिलासा मिळवून दिला होता. त्यांच्याच प्रयत्नांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमधून खास दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा मिळाला होता. शिवाय, आर्थिक पिळवणूक आणि अन्यायाची वागणूक देखील बंद झाली होती. मात्र, २००५ पासून सुरु असलेला विशेष डबा अचानक महिन्याभरापासून कुठलीही पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आला. इतकेच नव्हे तर दुग्ध परिवहनाला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया येथील दूध उत्पादक क्षेत्राला फटका बसला. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला.