मालवाहू वाहन नाल्यात कोसळल्याने एक ठार, दोघे जखमी

0
4

आल्लापली,दि. १४: आलापल्ली येथून आष्टीकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्यात कोसळले. या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास चौडमपल्ली नाल्यावर घडली. सरदार खॉ बिसमिल्ला खॉ पठाण (५५) रा. गोकुलनगर गडचिरोली, असे मृत इसमाचे नाव आहे. वाहन चालक संतोष दिलीप शंकरवार व अशोक गुणाजी भोयर हे दोघे जण जखमी झाले.
संतोष शंकरवार, अशोक भोयर व सरदार खाँ पठाण हे एमएच-३५ ए-१३५० क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनाने भामरागड येथे पोषण आहार वाटप करण्यासाठी गेले होते. काल रात्री भामरागडवरुन आष्टीकडे परत येताना चौडमपल्ली नाल्यावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन नाल्याच्या काठावर लावलेले कठडे तोडून खाली कोसळले. या अपघातात सरदार खॉ बिसमिल्ला खॉ पठाण हे जागीच ठार झाले, तर वाहनचालक संतोष शंकरवार व अशोक भोयर हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती केले. पुढील तपस सहायक फौजदार सोनटक्के, संघरक्षित फुलझेले करीत आहेत.