ओबीसी, आदिवासींना न्याय देण्यासाठी शरद पवारांचा दौरा: धर्मरावबाबा आत्राम

0
16

गडचिरोली, दि.१४: जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करणे, आदिवासींचा वळविण्यात आलेला निधी पुन्हा मिळवून देणे, लोहखनिज कारखाना जिल्ह्यातच व्हावा यासाठी प्रयत्न करणे तसेच तेलंगणा सरकारच्या धरणांमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौकातून रॅली काढण्यात येईल. त्यानंतर मूल मार्गावरील अभिनव लॉनवर शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला शरद पवार संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. जवळपास २४ वर्षांनंतर शरद पवार प्रथमच गडचिरोलीत येत आहेत, अशी माहितीही श्री.आत्राम यांनी दिली.

धर्मरावबाबा म्हणाले, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरुन ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे. सध्याच्या सरकारने निव्वळ आश्वासन दिले. परंतु ओबीसींचे आरक्षण कमी केले नाही. नको तेथे पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. हा अन्यायाबाबत शरद पवार यांना अवगत करण्यात येणार आहे. आदिवासींसाठी असलेला ९ टक्के बजेटमधील निधी इतरत्र वळविण्यात येत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. श्रवंती-चव्हेला धरणामुळे तेलंगणा राज्याला फायदा होणार आहे. मात्र, चपराळा अभयारण्यासह परिसरातील गावांना मोठे नुकसान होणार आहे. मेडिगड्डा धरणामुळे ५८ किलोमीटरपर्यंत बॅकवॉटर येणार असल्याने सिरोंचासह अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकही नष्ट होणार आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा होणार आहे.पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर उपस्थित होते.