प्रसूत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
9

गोंदिया-येथील गंगाबाई महिला रुग्णालयात बुधवारी दुपारच्या सुमारास एका प्रसूत महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मृतक महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच तेथील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करीत त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. लता मुकेश यादव (वय २२, रा. शास्त्रीवार्ड, गोंदिया) असे प्रसूत मृत महिलेचे नाव आहे.

गंगाबाई रुग्णालयातील प्रसूतितज्ज्ञ डॉ. सयास केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता जाधव या गर्भवती महिलेला ६ जानेवारी रोजी प्रसूतिसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७ जानेवारीला या महिलेवर शस्त्रक्रिया करून तिची प्रसूती करण्यात आली. यात महिलेने १ किलो २०० ग्रॅम वजनाच्या कुपोषित बाळाला जन्म दिला. शस्त्रक्रियेनंतर महिला पूर्णपणे स्वस्थ होती, तर तिच्या नवजात बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. नवजात बाळाला दूधप्राशन करता यावे, या उद्देशाने तिला रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र, बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास महिलेची प्रकृती अचानक खालावली. त्यादरम्यान महिलेला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना राठोड यांनी त्यांच्यावर उपचार केले. तसेच त्यांची तपासणी केली असता सर्व बाबी सामान्य आढळून आल्या. मात्र, चार वाजताच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला.

महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या सोबत असलेल्या कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावत गोंधळ घालावयास सुरुवात केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या २० दिवसांपासून सदर महिला प्रसूतिनंतर या रुग्णालयात भरती होती. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावतच होती. मात्र, गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. यामुळे बुधवारी तिचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. अमरीश मोहबे यांनी, ‘बाळ कुपोषित असल्याने बाळाला नळीने दूध प्राशन करावे लागत होते. यामुळे महिलेच्या छातीला दुखणे झाले असेल. त्यामुळेच हृदयात सूज येवून हलक्या अटॅकमुळेही तिचा मृत्यू झाला असावा’, अशी शक्यता वर्तविली. मात्र खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र यावर मृत महिलेचे कुटुंबीय समाधानी नसून त्यांनी या प्रकरणी डॉक्टरांचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, असा आरोप करीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच रुग्णालय परिसरात गोंधळ घालायला सुरुवात केली. वृत्त लिहीपर्यंत रुग्णालय परिसरात तणावावाचे वातावरण होते.