नक्षलमुक्तीच्या नावाखाली विकासाला कात्री-माजी आमदार वाघाये

0
16

भंडारा : पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे. हे प्रभाव क्षेत्र भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यात केला होता. परंतु राज्यातील युती शासनाने हे तालुके नक्षलमुक्त करुन या भागात येणाऱ्या निधीवर निर्बंध घातले असल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून विकासकामांना कात्री लावत आहे. त्याचा परिणाम मागास जिल्ह्याच्या विकासावर होणार आहे. तत्कालीन केंद्र शासनाने भंडारा जिल्ह्यात सुरु केलेली ‘डावी कडवी विचारसरणी’ योजना बंद केली आहे. त्यामुळे ही विकासकामे ठप्प होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने ‘अच्छे दिन’ च्या योजना सुरु ठेऊन विकासात आघाडी घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने या भागात देण्यात येणारा निधी बंद केला आहे किंवा केवळ कर्मचाऱ्यांचे भत्ते बंद करण्यात आले, याबाबत सरकारने, प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त भागात साकोली विधानसभा क्षेत्राला सामावून घेण्यासाठी आपण आवाज उचलला होता.

त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या क्षेत्रातील तीन तालुक्यांचा नक्षलग्रस्त भागात समावेश करण्यात आला होता. आता हे तालुके वगळण्यात आल्यामुळे हा निधी बंद होणार आहे. परिणामी विकासावर त्याचा परिणाम होणार असल्याचेही वाघाये यांनी सांगितले