आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचा सत्कार

0
8

गडचिरोली-रक्तरंजीत हिंसाचाराची चळवळ सोडून लोकशाहीवर विश्वास ठेवून आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचा पालकमंत्री अंब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोकभिमुख विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, मुख्य वनसंरक्षक टीएसके रेड्डी, उपविभागीय अधिकारी पी.शिवशंकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, राजकुमार शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी उपस्थित होते.
औद्योगिक धोरणांतर्गत युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. रोहयो अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला काम मिळेल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल क्षेत्रात विकासाला निर्माण होणाऱ्या अडथळय़ावरती मात करण्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घ्यावा, नवसंजीवन योजनेच्याव्दारे तसेच नक्षल चळवळीपासून दूर जाण्यासाठी मत परिवर्तन करून आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करावे, अतिदुर्गम गावे मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी आम्ही कटिबध्द असून सर्वागीण विकासासाठी हे शासन सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे. यावेळी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसोबतच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मंगेश देशमुख, जिल्हा गुणवंत जिल्हा पुरस्कार प्राप्त करिश्मा भोयर, जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त कुणाल पडलवार, प्रतिभा प्रभाकर चौधरी, निलिमा कर्मजित सिंह यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रपती पदकाचे मानकरी शहीद गणपत नेवरू मडावी, गिरीधर नागो आत्राम, सुनील तुकडू मडावी यांच्या कुटुंबीयांचा तर पोलीस अधीक्षक सुवेझ हक, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत अशोक काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस शिपाई सदाशिव लखमा मडावी, गंगाधर सिडाम, मुरलीधर वेलादी, पोलीस उपनिरीक्षक अतुल तवाडे, अंकुश माने, शिपाई विनोद हिचामी, इंदरशाह शेडमेक यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विनोद देशमुख यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी मानले.