गडचिरोली, ता.२९
स्वयंपाक करू देण्यास नकार दिल्याने सी-६० पथक व पोटेगाव पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील पुसेर येथील गावपाटलास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना २७ जानेवारीच्या संध्याकाळी घडली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी भाकप व भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिका-यांनी आज(ता. २९) येथे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, पुसेरचे गावपाटील केसरी मट्टामी यांच्यासह गावकरी उपस्थित होतेे. केसरी मट्टामी यांनी सांगितले की, २७ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास सी-६० पथक व पोटेगाव पोलिस मदत केंद्राचे जवान पुसेर येथे आले. त्यानंतर ७-८ जवान माझ्या घरी आले असता पाणी व चहा पाजून त्यांचे स्वागत केले. पुढे रात्र झाल्याने पोलिसांनी गावात मुक्काम करून माझ्या घरी स्वयंपाक करण्याचे ठरविले. परंतु आमचे घर लहान असल्याने तुुम्ही गोटूलमध्ये स्वयंपाक करा, अशी विनंती माझ्या पत्नीने पोलिसांना केली. काही वेळानंतर पोलिसांनी ही बाब आपल्या प्रमुखांना सांगितली. त्यावेळी मी चौकात उभा असताना पथक प्रमुखांनी आपणास धाक दाखवून शिवीगाळ केली. काही पोलिस काठीने मारहाण करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र गावक-यांनी मध्यस्थी केल्याने पोलिसांनी मारहाण केली नाही. हे प्रकरण येथेच शांत झाले होते. दुस-या दिवशी सकाळी मी शौचास जात असताना पथक प्रमुखांनी मला बोलावून पोलिस ठाण्यात येण्यास बजावले. मात्र मी नकार दिला. यावेळी सर्व गावकरी उपस्थित होते. पोलिसांनी त्यांनाही शिवीगाळ केली. केसरी मट्टामीला पोलिस ठाण्यात हजर न केल्यास गावक-यांना झोडपून काढू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याने सर्वजण भयभीत झाल्याचेही केसरी मट्टामी यांनी सांगितले.
दरम्यान भाकप व भारिप-बमसं या घटनेचा निषेध करीत असून, पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ.महेश कोपुलवार व रोहिदास राऊत यांनी केली. यासंदर्भात त्यांनी पीडित गावक-यांसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे व उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल खाडे यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली.




