चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा

0
19

भंडारा,दि.22 : मौदा तालुक्यातील तोंडली या गावात शाळा सुटल्यानंतर खेळत असताना मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २२ मुलांना विषबाधा झाली. या सर्व मुलांनी ओकाऱ्या करायला सुरुवात केल्याने त्यांना कोदामेंढी आणि खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. खात येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. कोदामेंढी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने मुलांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली होती. सर्वांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले आधीचे कार्यक्रम बाजुला सारत सरळ रुग्णालयात धाव घेतली.आणि जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.रविशेखर धकाते यांच्यासोबत मुलांची पाहणी करुन विचारपूस केली.
विषबाधा झालेल्या मुलांमध्ये सानिया कारूजी बाबरे (१०), साहील जगनाडे (९), नक्ष प्रमोद जवजारे, ऋषी राजेश शेंडे (५), संस्कार जगदीश शेंडे (५), समर जीवन उके (६), सिद्धार्थ जीवन उके (५), आउस दिलीप धांडे (९), दीपासू ज्ञानेश्वर ठवकर (६), समिक्षा ज्ञानेश्वर ठवकर (१०), समीर राजू आखले, नयन महेश जवजारे, मधुकर लोहकरे, राजू आखले, सुजन श्रावण ईश्वरकर (८) सर्व रा. तोंडली, ता. मौदा यांच्यासह अन्य सात मुलांचा समावेश आहे.
हे सर्व मुले गावालगतच्या मोकळ्या जागेवर नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खेळत होती. शेजारी चंद्रज्योतीची झाडे असल्याने तसेच त्या झाडांना फळे असल्याने काहींनी चंद्रज्योतीच्या बिया खायला सुरुवात केली. त्या बिया चवीला चांगल्या लागत असल्याने इतर मुलांनीही त्या खाल्ल्या.खेळणे आटोपल्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली. त्यानंतर सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास या मुलांना एका पाठोपाठ एक अशा ओकाऱ्या व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. परिणामी, पालकांनी १७ मुलांना कोदामेंढी आणि पाच मुलांना खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. या सर्व मुलरंची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.