देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गाचे भूसंपादन खाजगी वाघाघाटीतून

0
9

गडचिरोली,दि.22 – देसाईगंज ते गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यात आली असून निर्धारित वेळेपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. या रेल्वेमार्गासाठी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार असून ३ डिसेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

या कामासाठी ज्या व्यक्तींची जमीन खरेदी करावयाची आहे, त्याचा मालकी हक्क अधिकार तपासून बघावयाचा असतो. हे काम विधीतज्ञांमार्फत पूर्ण झाले आहे. या जमिनीच्या संपादनाच्या सर्व बाजुंची चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. या जमिनीच्या दरनिश्चितेचे काम नगररचना विभागाचे संजय बारई करीत आहेत. ज्यांची जमीन या कामात संपादन करायची आहे, त्या सर्व शेतकºयांची नावे सर्व्हे क्रमांकासह एका उद्घोषणेत जाहीर करण्यात आली आहेत. उपविभागीय अधिकारी गडचिरोली आणि देसाईगंज यांच्या कार्यालयांमध्ये या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जागेची दर निश्चिती २४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर २७ नोव्हेंबर पासून गावनिहाय शेतकºयांना वाटाघाटी करण्यासाठी बोलाविण्यात आलेले आहे. वाटाघाटीव्दारे भूसंपादनाव्दारे प्रक्रिया देसाईगंज तसेच गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयांमध्ये होणार आहे. या कामाला अधिकारी स्तरावर सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आलेली असून यात रेल्वेचेही पूर्ण सहकार्य लाभत आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व स्तरावर खबरदारी घेण्यात आली असून येणाºया काळात याला अधिक गती दिली जाईल, असे प्रशासनातर्फे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी कळविले आहे.