पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाईंना गुगलचं अभिवादन!

0
12

मुंबई,दि.22(वृत्तसंस्था) : ब्रिटीशकालीन भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने आज एक खास डुडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, महत्त्व नव्हते, अशा काळात रखमाबाईंनी रूग्णांची वैद्यकीय सेवा केली.मराठमोळ्या स्त्रीच्या पोशाखात गळ्यात स्टेथोस्कोप घातलेल्या रखमाबाई रुग्णांना तपासत आहेत असे चित्र गुगलने खास डूडलद्वारे प्रसिद्ध करून अभिवादन केले आहे. २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबईत जन्मलेल्या रखमाबाई राऊत यांचा आज १५३ वा जन्मदिन आहे. त्यांना रखमाबाई या नावाने ओळखले जाते. त्या ब्रिटीश काळातील पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. रुग्णसेवा करतानाच भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता. बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.

वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाई यांचे 19 वर्षीय दादाजी भिकाजी यांच्याशी लग्न झाले. मात्र, आईच्या घरी राहूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १८८४ मध्ये दादाजींनी वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही रखमाबाईंना वैवाहिक अधिकाराचे पालन करा अथवा तुरुंगात जा अशी तंबी दिली. मात्र रखमाबाईंनी अजाणत्या वयात सहमती शिवाय झालेला विवाह आपण मानत नाही असे सांगून पतीकडे नांदायला जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण तत्कालीन समाजसुधारक रमाबाई रानडे, बेहरामजी मलबारी यांच्यापर्यंतही गेले. अखेर रखमाबाई यांच्या पतीने काही रक्कम घेऊन घटस्फोट घेतला.