गोंदिया,दि.03 : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांचा घेरावा घालून संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
धर्मश्याम चंद्रसेन पटले (४८) रा. नवरगाव असे बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने मृत्यु झालेल्या रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पटले यांना खोकल्याच्या त्रास असल्याने शनिवारी (दि.२) दुपारच्या सुमारास त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयुच्या बेड क्रमांक दोन दाखल करण्यासाठी डॉ. मोनल अग्रवाल यांनी पाठविले. मात्र त्या क्रमांकाचा बेड खाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना जनरल वार्डात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना आक्सिजन मॉस्क लावण्यात आले. मात्र त्यात आक्सिजन नसल्याने रुग्ण जोरोने श्वास घेवू लागला. रुग्णांच्या नातेवाईकांनी याची माहिती उपस्थित वैद्यकीय अधिकाºयांना दिली. मात्र त्यांनी वेळीच उपचार करणाºयाकडे दुर्लक्ष केल्याने पटले यांचा मृत्यु झाला. दरम्यान या घटनेची माहिती पटले यांच्या नातेवाईकांनी काँग्रेस नेता अमर वराडे, आलोक मोहंती, अॅड.योगेश अग्रवाल, जि.प.सदस्य शेखर पटले यांना दिली. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात पोहचत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रुखमोडे यांचा घेराव घालून याचा जाब विचारला. तसेच हलगर्जीपणा करणाºया डॉक्टरावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.




