जिल्हा हागणदारीमुक्त करून जनतेला चांगले आरोग्य देऊ

0
13

गडचिरोली,दि.03ः- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१८ पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करून जिल्ह्यातील जनतेला चांगले आरोग्य देण्याचे स्वप्न पूर्ण करू, असा संकल्प आज २ डिसेंबर रोजी राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी कार्यशाळेत केला.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्यावतीने गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याकरीता पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा सांस्कृतिक भवनात आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर, पठारे, युनिसेफचे जयंत देशपांडे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ना. आत्राम पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या समोर आदराने डोक्यावर पदर घेतात. ही आपली संस्कृती आहे. जगामध्ये भारतीय संस्कृती ही आदर्श म्हणून मानली जाते. महिलांना एवढे महत्त्व असताना, आपली माता, भगिनी लोटा घेऊन शौचास बाहेर जाते. ही बाब आपल्या संस्कृतीस शोभणारी नाही. आपल्या आया-बहिणींची लज्जा राखणे तसेच उघड्यावर शौचास जाण्यामुळे होणारी कुचंबना थांबवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी महत्वाचा भाग म्हणजे घरातील महिला, वडीलधारी मंडळी व लहान मुले यांच्यासाठी शौचालय असणे व त्याचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. याकरिता आपल्याला घराघरात शौचालय बांधकाम करणे आवश्यक झाले आहे. जेणे करुन सर्वांना याचा वापर करता येईल,असेही ते म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकुल परिस्थितीमध्ये सुध्दा देसाईगंज, कोरची, मुलचेरा ही तीन तालुके हागणदारीमुक्त झाली आहेत. याबद्दल तेथील जनतेचे, प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे डिसेंबर अखरेपर्यंत भामरागड, आरमोरी, गडचिरोली, कुरखेडा व धानोरा ही तालुके हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन आहे. उर्वरित तालुके हागणदारीमुक्त करून मार्च २0१८ अखेरपयर्ंत गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतीपैकी २२७ ग्रामपंचायती आजपर्यंत शासनाने हागणदारीमुक्त घोषित केलेल्या आहेत. उर्वरित २२९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होणे बाकी आहेत. त्यामध्ये ४४ हजार २५६ लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालय बांधकाम करायचे आहे. जे शौचालय आहे त्याचा वापर नागरिकांनी, घरातल्या सर्व सदस्यानी नियमित वापर करावा व गडचिरोली जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.
कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन योगेश फुसे यांनी केले.