पर्यावरणाच्या कायद्याला डावलून रेतीचा उपसा

0
11

भंडारा,दि.5ः- मुंढरी रेतीघाट लिलावधारकांनी सिमांकनाबाहेरल रेतीचा उपसा चालविला आहे. त्यातही पर्यावरणाच्या कायद्याला ठेंगा दाखवित सुमारे ६ मीटरपर्यंत उपसा सुरू आहे. मात्र, या गैरप्रकाराकडे सर्व विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे. लिलाव करारनाम्याचा, कान्हळगावच्या हद्दीचा, स्मशानभूमीच्या रस्त्याचा गैरवापर होत असतानाही महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही गंभीर नाही. प्रकरण दडपण्यासाठी उपोषणाकडे अधिकार्‍यांनी व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली असून कुणीही दखल घेतलेली नाही. लोकशाहीचे मुल्य पायदळी तुडविण्यासाठी महसूल प्रशासनातील अधिकारी व घाटचालकांत ‘सेटींग’ झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून थेट चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंढरी (बु.) रेती घाटासाठी गावातील रस्ता करारनाम्यानुसार प्रस्तावित असताना घाटधारकांनी कान्हळगावातील हद्दचा, रस्त्याचा तसेच शासकीय सामाजिक वनिकराच्या जागेचा तसेच पाणी पुरवठा योजनेचा गैरवापर चालविला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या कायद्याला मुठमाती देत जमिनीपासून खरडून सुमारे २ मीटरपर्यंत कृषक ट्रॅक्टरच्या साहाय्याने खुलेआम उपसा सुरू आहे. यामुळे गावाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असताना एकाही अधिकार्‍याला या गंभीर प्रकाराची दखल घ्यावीशी वाटत नाही.
गावाचे हित जोपासण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असतानासुद्धा रेतीघाट मालक व काही अधिकार्‍यांच्या संगनमताने गैरप्रकार सुरू आहेत. दि. ३0 नोव्हेंबरपासून माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांच्या नेतृत्वात धनराज भोयर, रामभाऊ कुकडे, दादाराम भोयर व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मात्र, अद्यापही उपोषणकर्त्यांशी चर्चा करून न्यायासाठी वाटाघाटीचा प्रयत्न झालेला नाही. अधिकार्‍यांनी उपोषणाकडे डोळेझाक केली आहे.
ग्रामपंचायतचे जबाबदारी पदाधिकारी अधिकाराचा दुरूपयोग करीत आहेत.
कान्हळगाव येथील पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण खर्च करातून केला जातो. मात्र, मागील आठवड्यापासून या योजनेचे पाणी रेतीघाटमालकाला दिले जात आहे. यासाठी ग्रामसभेची किंवा ग्रा. पं. ची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. चार दिवसांपासून उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्यासंदर्भात एकाही अधिकार्‍याने पुढाकार घेतलेला नाही. उपोषणामुळे माजी सरपंच धनराज भोयर ,डॉ. पुंडलिक डोंगरवार आणि भोयर यांची प्रकृती खालावली आहे.