महिलांनी केले महिला रूग्णालयाचे भूमिपूजन

0
19

भंडारा दि.०६ : जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालय व्हावे, यासाठी आमदार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने आपण भंडाऱ्यात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय मंजूर करून घेतले. परंतु आता भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी अशा लोकांना धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.दरम्यान, महिला रूग्णालयासाठी नियोजित जागेवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाºयांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
भंडारा येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, संजय रेहपाडे, अ‍ॅड.वसंत एंचिलवार, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, उपसभापती ललीत बोंदरे, डॉ.अश्विनी भोंडेकर, आशा गायधने, नंदा दुरूगकर, कुमुदिनी कढव, रंजना निमजे, रूपलता वंजारी, यशवंत सोनकुसरे, रवी वाढई उपस्थित होते.
यावेळी भोंडेकर म्हणाले, सन २०१२ मध्ये महिला रूग्णालयाला मंजुरी मिळूनही जागेअभावी काम रखडले होते. त्यानंतर आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांना भेटून २०१९ च्यापूर्वी महिला रूग्णालयाला मंजुरी देऊन निधी मंजूर करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा शिवसेना पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता, असा गौप्यस्फोट भोंडेकर यांनी यावेळी केला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी महिला रूग्णालयाला मंजुरी देत २५ लाख रूपयांची तरतूद केली. असे असताना भाजपचे आमदार शिवसेनेचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. यावेळी राजेंद्र पटले म्हणाले, मेळाव्यातील महिलांची उपस्थिती हा शिवसेनेचे अस्तित्व दाखविणारा मेळावा ठरल्याचे सांगितले. जया सोनकुमसरे यांनी विकासासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिक्षणातून कुटुंबाला प्रगतीकडे नेण्याचा तो विकासमार्ग ठरावा, असे प्रतिपादन केले. यावेळी आशा गायधने, डॉ.अश्विनी भोंडेकर, कुमुदिनी कडव, रंजना निमजे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रश्मी पातुरकर यांनी केले.