राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी महाअधिवेशन २0 डिसेंबरला

0
11

नागपूर,दि.०६ ः-ओबीसींच्या विविध मागण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे २0 डिसेंबरला विद्यार्थ्यांच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. धनवटे नॅशनल कॉलेज येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणार्‍या एकदिवसीय महाअधिवेशनात विदर्भातील ५ हजारपेक्षा विद्यार्थी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या काही मागण्या राज्य व केंद्र सरकारने मान्य केल्या आहेत. परंतु, स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना, मंडल आयोग-नच्चीपन आयोग-स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शंभर टक्के करावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तहसीलस्तरावर स्वतंत्र वसतिगृह, विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग, ओबीसीचा अट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश यासह १८ महत्त्वाच्या मागण्या अजुनही मान्य करण्यात आल्या नाहीत. याकडे आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधन्यासाठी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि युवक-युवतींच्या महाअधिवेशनाचे उद््घाटन महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून पूजा मानमोडे आणि अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बोपचे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे व ज्येष्ठ विचारवंत अँड. गणेश हलकारे उपस्थित राहणार आहेत. महाअधिवेशनाच्या द्वितीय सत्रात ओबीसी विद्यार्थ्यांना विविध समस्यावर बबलू कटरे, मेशा रामगुंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. शेषराव येलेकर, माधव कांबळे यांच्यासह अनेक तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला शरद वानखेडे, संजय पन्नासे, रोशन कुंभलकर, शुभम वाघमारे, वैशाली भारद्वाज, अंजिक्य देशमुख, विनोद हजारे उपस्थित होते.