धाबेपवनीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी

0
32

अर्जुनी मोरगाव,दि.१०: तालुक्यातील धाबेपवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समस्यांचा डोंगर उभा असल्याचेचित्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या भेटीत दिसून आले. डॉक्टरांची उदासिनता, कर्मचार्‍यांची बेपर्वा प्रवृत्ती आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडल्याचे दिसून आल्याने उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गास चांगलेच धारेवर धरले व येत्या आठ दिवसात रुग्णालयातील समस्या निवारणाकरीता उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
धाबेपवनी हे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील मध्यवर्ती गाव आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून मागील २ वर्षापूर्वी १00 लाख रुपये खर्च करून सुसज्ज इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु, कंत्राटदाराने रूग्णालयाचे अनेक कामे अपूर्ण ठेवली आहेत. बांधकामाला दोन वर्ष लोटूनही शस्त्रक्रिया गृहासमोरील व्हरांड्याच्या खोलीला २ दरवाजे लावण्यात आले नाही. दरवाज्याअभावी रुग्ण शस्त्रक्रिया गृहाजवळूनच ये-जा करतात. त्यामुळे रुग्णांना धोका संभवतो. ज्याठिकाणी औषधीसाठा ठेवण्यात येतात, त्या आलमारीला पल्लेच नसल्यामुळे व त्याठिकाणी पाणीगळती होत असल्याने औषधे खराब होत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपाध्यक्षांना सांगितले.
कार्यालयीन कक्ष व इतर पेशंटच्या कक्षाच्या छताला लावलेले ट्युबलाईट वर्षभरात प्लॅस्टर कमकुवत झाल्याने गळून पडले. रुग्णालयाच्या बांधकामासोबतच कर्मचारी वसाहतीचेही बांधकाम करण्यात आले. परंतु, तेथे अद्यापही पिण्याच्या पाण्याची व विद्युतपुरवठा व्यवस्था नसल्याने कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे ही निवासस्थाने ओसाड पडली असून विषारी जिवजंतुंचा धोका नेहमीच बळावलेला राहतो.
आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी असून टेक्नीशियनचे पद रिक्त आहे. अशा अनेक समस्यांमुळेच आरोग्य केंद्रालाच सलाईन देण्याची खरी गरज असल्याचे दिसत आहे. यावेळी जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी, येथील समस्या या स्थानिकस्तरावर सुटू शकणार्‍या असून त्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍याने सकारात्मक दृष्टीने विचार करावा लागेल. तसेच इस्टीमेटनुसार बांधकाम झाले नसेल तर कंत्राटदारावर निश्‍चितच कार्यवाही केली जाईल.