वैदर्भीय जनतेच्या हिताकरिता विदर्भ वेगळा करा

0
18

नागपूर,दि.11ः- वेगळा विदर्भ, शेतकरी आत्महत्या, वैदर्भीय युवकांचे स्थलांतरांसह आदी विषयांमुळे विदर्भातील जनता त्रस्त आहे. यावर एकमात्र रामबाण उपाय म्हणजे वेगळा विदर्भच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे दिल्ली दरबारी असलेले राजकीय वजन वापरून वेगळा विदर्भ करावा, अशी सूचना वजा मागणी आ. आशीषदेशमुख यांनी केली आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्त साधून ६ डिसेंबर रोजी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध विषयांवर पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.
आ. आशीष देशमुख यांच्या मते, राज्यात गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या भाजप शासनात तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शेतकरी सुखी नाही, तरुणांना रोजगार नाही, शेतमालाला भाव नाही भरातभर म्हणजे इतर राज्याच्या तुलनेत राज्याची कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली आहे. यातुलनेत छोटे राज्य असलेल्या तेलंगणा तसेच छत्तीसगडमध्ये परिस्थिती चांगली आहे. संपूर्ण राज्यातील खनिज संपदेतील ९0 टक्के खनिज संपदा विदर्भात असतानासुद्धा ज्या वैदर्भीय जनतेने पक्षाला ४४ आमदार निवडून दिले त्यांनाच महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. परिणामी, महागड्या विजेमुळे या भागातील उद्योग रसातळाला गेले तसेच नवीन उद्योग धंदे निर्माण होण्याला बाधा निर्माण होत आहे. माझी मेट्रो, स्मार्ट सिटी, सिमेंट रोड आणि समृद्धी महामार्ग आदी पायाभूत सोयींमुळे जनतेचा फायदा होईल. या प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च होत असताना वैदर्भीय शेतकर्‍यांच्या आत्महत्या व बेरोजगारी संपविण्याकरिता आपण प्रयत्नरत आहातच. मात्र, अखंड महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री असल्याने इच्छा असतानासुद्धा आपणाला निधी वाटपात आपणाला समतोल राखावा लागतो. परिणामी, अखंड महाराष्ट्रात विदर्भाचे उज्ज्वल भविष्य नसल्याने केंद्रात आपले असलेले राजकीय वजन वापरून वैदर्भीय जनतेच्या वरील समस्यांचे निराकरण करण्याकरिता वेगळा विदर्भ कराच, अशी सूचना वजा मागणी आमदार आशीषदेशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. भंडार्‍याचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांचे प्रकरण ताजे असतानाच तसेच हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर आ. देशमुखांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सूचना केल्याने आमदार आशीष देशमुखसुद्धा नाना पटोलेंच्या मार्गावर तर जात नाही ना? अशा राजकीय वावटळ्या उठत आहे. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार आशीष देशमुख यांचा पत्रप्रपंच कितपत ‘योग्य’ वाटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.