महाआरोग्य शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा- आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत

0
9

दहा हजार नागरीकांनी घेतला निःशुल्क आरोग्य सेवेचा लाभ

नागपूर, दि. १६ : आरोग्य शिबिरात रूग्णांसाठी अत्याधुनिक यंत्रांद्वारे निदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या आरोग्य सेवेचा लाभ प्रत्येक गरजू व गरीब रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केले. राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून कामठी येथील पोरवाल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या दोन दिवसीय निःशुल्क महाआरोग्य शिबीराच्या उदघाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, शासकीय दंत विद्यालय नागपूरच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निबांळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, कामठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. राजीव पोतदार प्रामुख्याने उपस्थित होते.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, शिबीरात तज्ञ व नामांकित डॉक्टरांची चमू उपलब्ध आहे. तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांनी रोगाचे अचूक निदान करुन घ्यावे. पुढील उपचारासाठी रुग्णांना शासनामार्फत शासकीय व खाजगी रुग्णालयात सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हयात तालुक्यांच्या ठिकाणी सहा शिबिर घेण्यात येणार आहेत. त्याकरिता आरोग्य विभागाच्या संपूर्ण यंत्रणेचे सहकार्य राहणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, या शिबिरात विविध प्रकारच्या रोगांवर निदान करण्यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सुमारे २५ हजार लोकांच्या उपचाराची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. मेडिकल, सुपर स्पेशालिटी, इंदिरा गांधी महाविद्यालय व खाजगी रुग्णालयातील सुमारे २०० तज्ञ डॉक्टरांची सेवा या शिबिराला लाभली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या दोन दिवसाच्या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या शिबिरात पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांनी नोंदणी करुन नि:शुल्क आरोग्य सेवेचा लाभ घेतला. दंत, स्त्रीरोग, बालरोग, जनरल सर्जरी, मनोविकार, नेत्ररोग, त्वचारोग, ह्दयरोग, किडनीरोग, कर्करोग, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, सिकलसेल, एचआयव्ही, होमिओपॅथी अशा एकुण ३१ प्रकारच्या वैद्यकीय विभागांचा शिबिरात समावेश आहे. या शिबिरात रुग्णांची प्राथमिक तपासणी करुन आजाराचे निदान करण्यात येत असून पुढील उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांना नि:शुल्क वैद्यकीय सेवेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याकरीता रुग्णांना स्टिकर्स देण्यात आले असून वैद्यकीय चमू संबंधित रुग्णांच्या घरी भेट देणार आहे. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दिला जाणार आहे. हे शिबिर दोन दिवस चालणार असून यात २०० तज्ञ डॉक्टरांसह ३०० नर्स आणि ५०० स्वयंसेवक आपली सेवा देत आहेत.
संचालन डॉ. प्रिती मानमोडे व डॉ. श्रीकांत वनीकर यांनी केले तर आभार डॉ. विवेक मुलतानी यांनी मानले. यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. महेश महाजन, डॉ. हरिश राजगीरे, डॉ. मनिषा राजगिरे, डॉ. मोहन येंडे, डॉ. ममता बिजवे यांच्यासह अनेक मान्यंवर उपस्थित होते.