गोंदिया-भंडारा जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर करा,धानउत्पादक जिल्ह्यातील आमदारांची मागणी

0
16

नागपूर,दि.19ः- पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्हयातील धान उत्पादकांना राज्य सरकारने १० हजारांची मदत करावी तसेच पावसाअभावी ६५ टक्के भागात रोवणीच झाली नाही, यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी या भागातील आमदारांनी केली. मात्र, राज्य सरकारकडून कुठलाही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने सत्तापक्ष व विरोधी अशा दोन्ही बाकांवरील या भागातील आमदारांनी अध्यक्षांपुढे धाव घेत मदतीसाठी घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करावे लागले. त्यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी या भागातील आमदारांची बैठक घेऊन सकारात्मक निणंय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले. भाजपचे आमदार बाळा काशीवार ​आणि इतरांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली.
बदलत्या वातावरणामुळे मावा व तुडतुडा या किडींची लागण झाल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गोंदिया जिल्हयात ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूणं ​जिल्हयात केवळ २० टक्केपेक्षही कमी आणेवारीवर पीक असतानाही अद्याप त्याची सरकारदप्तरी नोंद करण्यात आली नाही. २० जून, २०१७ रोजी कीड व रोगाने संपू्र्ण पिकांचे नुकसान झाले असताना मंडळ स्तरावर सरासरी उत्पादनावर पीक विम्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले. कापूस व सोयाबीन या पीकांसंदर्भात निकष धान पिकालाही लागू असल्याने धानउत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभाची अट समाविष्ट करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी या भागातील आमदारांनी केली.

साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी धानउत्पादकांच्या तक्रारी मांडल्या. आमदार विजय वडेट्टीवार यांनीही १० हजारांची मदत जाहीर करून, ज्यांनी रोवणी केली नाही त्यांना मदत करणार का, असा सवाल केला. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वैयक्तिक पंचनाम्याबाबत तपासून कारवाई करण्यात येईल, असे उत्तर दिले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मध्यस्थी करीत वैयक्तिक पंचनाम्याची तयारी दर्शविली. तसेच, यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. राष्ट्रवादीचे अजीत पवार यांनी केंद्राकडे गेलेल्या प्रस्तावावर निर्णय होईल तेव्हा होईल, सध्या त्यांना मदत करणार का, असा आग्रह केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फर​सिंगवर चर्चा झाल्याचे सांगत मदतीचे आश्वासन दिले. भाजपचे चरण वाघमारे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल,भाजपचे संजय पुराम यांनीही तातडीने मदत करीत, धानउत्पादक जिल्हे दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी रेटून धरली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही ६० टके भागात रोवणी झालीच नाही, असे सांगत १० हजाराची मदत करा, अशी मागणी केली. गोंधळ व तहकुबीनंतर अखेर कृषिमंत्री फुंडकर यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेऊन मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.आमदार पुराम यांनी तर आमगाव-देवरी मतदारसंघातील शेतकरी व मतदार हे पक्षावर नाराज असल्याचे सांगत मतदारसंघ तत्काळ दुष्काळग्रस्त जाहिर करावे अशी मागणी सभागृहात केली.