‘वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा’-ना.आठवले

0
9

नागपूर,दि.19 – भाजपचे स्वतंत्र विदर्भ राज्याला समर्थन आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार असल्याने भाजपची अडचण आहे. मात्र, पुढील निवडणुकीत शिवसेना सत्तेत राहणार नाही. भाजपची एकहाती सत्ता आल्यास विदर्भाची निर्मिती होईल, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले. आरपीआय (ए) विदर्भ राज्य परिषदेत ते बोलत होते.  या वेळी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, आमदार आशीष देशमुख, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, ॲड. नंदा पराते, राम नेवले होते. आठवले म्हणाले, त्यांनी विदर्भाप्रमाणे पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि बोडोंच्या स्वतंत्र राज्याचा विचारही सरकारने करायला हवा. एनडीएची १५ डिसेंबरला बैठक झाली. पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षणामुळे दलितांवर अत्याचार होत आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला क्रिमिलेअरची अट घालून वेगळा प्रवर्ग तयार करून २५ टक्‍के आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.  या वेळी अविनाश महातेकर, भूपेश थूलकर, राजन वाघमारे, राजू बहादुरे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासोबत बंधपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अडचण निर्माण होणार असल्याने हा निर्णय मागे घेण्यासाठी मंत्री आणि सचिवांशी चर्चा करणार असल्याचे आठवले म्हणाले. शिष्यवृत्तीचे १२०० कोटी थकीत असून यातील ५०४ कोटी राज्याला दिले. शिष्यवृत्तीची रक्कम दोन टप्प्यात देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे  त्यांनी सांगितले.