ओबीसी बांधव धम्मपथावर

0
15

नागपूर,दि.26ः-शेकडो ओबीसी बांधवांनी सोमवारी कुटुंबीयांसह धम्मपथाचा मार्ग धरला. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी या सर्वांना त्रिशरण पंचशीलासह त्यांच्याकडून २२ प्रतिज्ञांचे वाचन करून घेतले. सोमवारी मनुस्मृतीदहन दिवस होता. गेल्यावर्षी याचदिवशी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येत ओबीसी बांधवांनी धम्मात प्रवेश केला होता. त्या सोहळ्याची आठवण ताजी करीत पुन्हा धम्मदीक्षा सोहळा घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई व लद्दाख येथील भदन्त संघसेन यांच्या उप​स्थितीत ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. प्रा. रमेश राठोड, संतोष भालेदार, हरिकिसनदादा हटवार आदींनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी बहुजन विचारवंत प्रा. जैमिनी कडू, डॉ. रूपाताई बोधी (कुलकर्णी), आदींनी संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रमेश राठोड होते. धम्मदीक्षा सोहळ्यात अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी बांधव सहभागी झाले होते. धम्मदीक्षेचा मुख्य सोहळा सुरू होण्यापूर्वी संविधान चौकातून दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तेथून निघालेली धम्मदीक्षा रॅली अडीच वाजताच्या सुमारास दीक्षाभूमीवर पोहोचली. त्यानंतर दीक्षाभूमीवर दीक्षा कार्यक्रम झाला. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी पांढऱ्या शुभ्र कपड्यांत आलेल्या ओबीसी बांधवांना मंचापुढे बोलावून धम्माबाबत माहिती दिली. त्यानंतर रीतसर धम्मदीक्षा सोहळा पार पडला. धम्मदीक्षा घेणाऱ्या काही कुटुंबीयांचे ‘बुद्ध अॅण्ड हिज धम्म’ ग्रंथ, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.

धम्मदीक्षा घेणाऱ्या ओबीसींना कायदेशीर प्रमाणपत्र देण्यासाठी वकिलांचे पथक दीक्षाभूमीवर होते. येथे नोंदणी झालेल्यांना धम्मदीक्षा घेतल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांच्याकडून रीतसर अर्जही भरून घेण्यात आले. यावेळी ओबीसी बांधव राठोड यांच्या कन्येचा विवाह बौद्ध बांधव चावरे यांच्या मुलाशी जुळला. त्यामुळे ‘रोटी बेटी’वरून निर्माण होणाऱ्या प्रश्नाचे उत्तरही याच धम्मदीक्षा सोहळ्यातून आयोजकांनी दिले. तत्पूर्वी, बहुजनवादी विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांनी ओबीसी बांधवांना संबोधित केले. धम्मदीक्षित धम्मभगिनी डॉ. रूपा बोधी यांनीही बौद्ध धर्माच्या वैचारिक बाबींवर प्रकाश टाकत, अवघ्या जगाला शांती व करुणेचा मार्ग दाखविणारा बौद्ध धर्म जगात सर्वोत्कृष्ट असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. पी. एस. खोब्रागडे, विजय मेश्राम, कुलदीप रामटेके, अमन कांबळे, सुनील तलवारे, तेजप्रताप मौर्य आदी विचारपीठावर उपस्थित होते. संचालन डॉ. राजेंद्र फुले यांनी केले.