राज्यसरकारचे कापूस व धानासाठीचे पॅकेज फसवे-अनिल देशमुख

0
13

नागपूर,दि.26 – ‘राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धान, कापूसउत्पादकांना मदत जाहीर केली. मात्र यातून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. केवळ कापूस व धानउत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजप सराकाने केले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी  केला.’कापूस व धानउत्पादकांना पॅकेज देताना राज्य सरकारकडून एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना होणार नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून एकही रुपया न जाता हे फसवे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

“एनडीआरएफ’च्या माध्यमातून केंद्र सरकार जर मदत करणार असेल, तर याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. परंतु केंद्राकडून अद्याप अशा मदतीचा कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. उलट ही मदत राज्य सरकारने करणे अपेक्षित होते. मात्र तसेही झाले नाही. पीकविम्यातून मदत देणार, असे सांगितले आहे. मग ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांचे काय?,” असा प्रश्न देशमुख यांनी केला.

देशमुख म्हणाले, की ज्या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी पेरले त्या बियाणे कंपन्यांनी बोंडअळीसाठी मदत द्यावी, असा आदेश भाजप सरकार काढणार आहे. परंतु सुरवातीपासूनच बियाणे कंपन्यांनी मदत देण्यासाठी हात वर केले आहेत. जर सरकारने त्यांना मदत देण्यासाठी आदेश जरी काढले व त्या विरोधात ते न्यायालयात जातील आणि शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. या पॅकेजमध्ये सोयाबीन उत्पादकांचा काहीच विचार करण्यात आला नाही. चांगले उत्पादन होऊनही या वर्षी सोयाबीनला भाव मिळाला नाही. यामुळे त्यांना बोनस जाहीर करावा, अशी अपेक्षा सरकारकडून होती. परंतु या कडेही त्यांनी दुर्लक्ष केले आहे.