सिव्हिल लाईन बोडी सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन आज

0
9

गोंदिया,दि.२८ः- उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता विकासकामे सुरू होत आहेत. त्याचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांकरिता बहुप्रतिक्षित असलेल्या सिव्हिल लाईन येथील बोडीच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला. नगर अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या पुढाकाराने सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत २८ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
सिव्हिल लाईन म्हणजे गोंदिया शहराचे हृदयस्थान आहे. येथे नगर पालिकेच्या मालकीची जुनी बोडी आहे. या बोडीचे सौंदर्यीकरण करून पर्यटन स्थळ तयार करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत होती. हा विषय गांभीर्याने घेत नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी आराखडा तयार केला. त्याकरिता अतिक्रमण केलेल्या नागरिकांची समजूत काढून अतिक्रमण काढले. मध्यंतरी न्यायालयाच्या आदेशाने काम सुरू करता आले नाही. मात्र आता न्यायालयाने परवानगी दिल्याने शहरातील इतर विकासकामांसह आता बोडीच्या सौंदर्यीकरण कामाला प्रत्यक्षरीत्या सुरुवात होणार आहे.
बोडीच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्व.किशोर इंगळे चौक येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष शिव शर्मा, बांधकाम सभापती घनश्याम पानतावणे, पाणी पुरवठा सभापती दिलीप गोपलानी, शिक्षण सभापती भावना कदम, नियोजन सभापती मैथुला बिसेन, महिला व बालकल्याण सभापती अनिता मेश्राम, नगरसेवक अफसाना मुजीब पठाण आदी उपस्थित राहणार आहेत.
त्याच बरोबर याच दिवशी दुपारी ३ वाजता हनुमान चौक सिव्हिल लाईन येथे भव्य प्रवेश द्वारचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी केले.