गडचिरोली नगर परिषद:भाजपचे १८ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

0
8

गडचिरोली, दि.१: केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना गडचिरोली नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता पुर्ण बहुमताने आली.मात्र सध्या विकासकामे होत नसल्याने तसेच नगराध्यक्षांच्या पतीची कामकाजात लुडबूड होत असल्याने त्रस्त झालेल्या भाजपच्या २१ पैकी तब्बल १८ नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेत बंडाचे निशाण फडकावल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

१९ डिसेंबर २०१६ रोजी गडचिरोली नगर परिषदेवर पहिल्यांदाच एकहाती सत्ता आली. सत्तास्थापनेला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी योगीता प्रमोद पिपरे यांना थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून येण्याचा बहुमान मिळाला आणि २५ सदस्यीय नगर परिषदेत भाजपचे २१ सदस्य निवडून आले. काँग्रेस व नगर विकास आघाडीचा प्रत्येकी एक व दोन अपक्ष नगरसेवक विजयी झाले. पुढे हे दोन अपक्ष नगरसेवक भाजपच्या गोटात शिरले. सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर स्वीकृत सदस्य घेण्याच्या हालचालींना वेग आला. त्यावेळी रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा आणि प्रमोद पिपरे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागली. स्वीकृत सदस्य म्हणून प्रमोद पिपरे यांचा कामकाजात हस्तक्षेप वाढू लागला. असे लक्षात येताच तब्बल १८ नगरसेवकांनी पिपरेंच्या विरोधात वेगळी मोहीम उघडली. गेल्या दोन महिन्यांत या असंतुष्ट नगरसेवकांच्या अनेक बैठका झाल्या. २६ डिसेंबरला झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एका नगरसेवकाने प्रमोद पिपरे यांना ‘तुम्ही स्वीकृत नगरसेवक आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही’, असे सुनावून टाकले. तसेच सर्व असंतुष्ट नगरसेवकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांनाही लेखी निवेदन देऊन विकासकामे होत नसल्याची तक्रार केली. सध्या हे असंतुष्ट नगरसेवक पिपरे यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ३१ डिसेंबरला पिपरे यांनी नगरसेवक व मित्रमंडळींना एका शेतात स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. परंतु १८ नगरसेवकांनी त्यांचे ‘आवतन’ नाकारुन वेगळी पार्टी आयोजित केली होती.