केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

0
10

नागपूर,दि.01 : कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सायंकाळी हा तक्रार अर्ज इमामवाडा पोलिसांकडे दिला. ठाणेदार रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हा तक्रार अर्ज देताना प्रा. राहुल मून, सुधीर भगत, अ‍ॅड. सुरेशचंद्र घाटे, सुखदेव मेश्राम, अमोल कडबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री हेगडेंविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्याच्या पुकानूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही राज्यघटना बदलविण्यासाठीच सत्तेत आलो. ती लवकरच बदलू’, असे विधान राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा सदर तक्रारअर्जात आरोप आहे. ‘सेक्युलर असणे म्हणजे मायबाप नसण्यासारखे आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दाला हरकत घेऊन अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे जाहीर वक्तव्य राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा आरोप’ तक्रारअर्जात आहे. हेगडे यांचे हे वक्तव्य देशातील जाती-धर्मात दुही निर्माण करणारे असून, त्यामुळे भारतातील नागरिकांची मने कलुषित होऊ शकतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी यापूर्वीच नोंदविण्यात आली आहे.