औषधांच्या फवारणीमुळे ३०० शेळ्यांचा मृत्यू

0
6

आल्लापल्ली,दि.4: कापूस व अन्य पिकांवर जहाल रासायनिक औषध फवारल्याने अहेरी तालुक्यातील बामणी व चेरपल्ली या दोनच गावांतील तब्बल तीनशेहून अधिक शेळ्या आठवडाभरात मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती आहे. बामणी येथील दुर्गय्या कुमरम यांच्या मालकीच्या तब्बल दीडशे शेळ्यांचा मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. आमरय्या कुमरम यांच्या २०, मनोहर झाडे यांच्या १६, नंदू सिडाम यांच्या १०, कुमरय्या चौधरी यांच्या २५, साईनाथ सिडाम ७, वासुदेव आत्राम यांच्या १०, लक्ष्मण पेंदाम यांच्या १० व सुरेश पेंदाम यांच्या मालकीच्या २ शेळ्यांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे.

अहेरी तालुका मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर बामणी व चेरपल्ली ही गावे आहेत. या गावांमध्ये अनेक शेतकरी पशुपालक आहेत. परंतु मागील आठ दिवसांपासून दोन्ही गावांतील शेळ्या अचानकपणे मृत्युमुखी पडत असल्याने पशुपालक भयभीत झाले आहेत. शेळ्यांचा मृत्यु नेमक्या कशामुळे झाला, याविषयी सखोल माहिती घेतली असता कापूस व अन्य पिकांवर काही शेतकरी विषारी कीटकनाशकांची फवारणी करीत असून, फवारणी केलेल्या झाडांची पाने खाल्याने शेळ्यांचा मृत्यु होत असल्याची गंभीर बाब पुढे आली. आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील काही शेतकरी बामणी व चेरपल्ली येथे येऊन मोठ्या प्रमाणावर शेती करीत आहेत. अल्पावधीत अधिक उत्पादन मिळण्याच्या हव्यासापोटी हे शेतकरी कापूस व अन्य पिकांवर जहाल रासायनिक औषधांची फवारणी करीत आहेत. या फवारणीमुळे आजूबाजूच्या रस्त्यावरची झाडेही विषारी होत आहेत. या झाडांची पाने खाल्याने शेळ्या मृत्युमुखी पडत आहेत. केवळ शेळ्याच नव्हे, तर या शेळ्यांचे दूध पिणारी पिल्लेही दूध प्यायल्याबरोबर मृत्युमुखी पडत आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या शेतांमध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलांच्या शरीरावर खाज सुटून त्यांच्या चेहऱ्यावर सूज येत आहे. शिवाय वृद्धांना गुडघेदुखीचा आजार होत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

गरीब लोकांच्या शेळ्यांचा मृत्यु होत असल्याची बाब लक्षात येताच नगरपंचायतीचे सभापती नारायण सिडाम, नगरसेवक संजय झाडे व सामाजिक कार्यकर्ते रिजवान शेख यांनी गावात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना विचारणा केली असता त्यांनी पंचनामा करण्यासाठी तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन्ही गावांत पाठविण्यात आले असून, मृत शेळ्यांचे पंचनामे करुन त्याचे नमुने तपासणी करण्यासाठी फॉरेंन्सिक लॅबला पाठविलेले जातील व अहवाल प्राप्त होताच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.