केंद्रीय चमूकडून मग्रारोहयोच्या कामाची पाहणी

0
5

भंडारा,दि.11 : केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारला जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. कार्यक्रम अधिकारी श्रुती सिंग व अनिलकुमार कट्टा या दोन अधिकाऱ्यांचा या चमूमध्ये समावेश होता. या अधिकाऱ्यांनी मोहाडी तालुक्यातील धोप येथील मनरेगा कामाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मनरेगाचे सहाय्यक आयुक्त कमलकिशोर फुटाणे, मोहाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, मनरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, खंडविकास अधिकारी आर.एम.दिघे व अधिकारी उपस्थित होेते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुशासन व सामाजिक अंकेक्षण करण्याच्या अनुषंगाने ही चमू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यात जनमाहिती फलक, केस रेकॉर्ड, वर्क फाईल, ग्रामपंचायतस्तरावर ७ रजिस्टर ठेवणे, जॉबकार्ड डिजाईन व तपासणी या विषयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मोहाडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत धोप येथे पांदण रस्ता, सिमेंट रस्ता वृक्ष लागवड, सिंचन विहिर, पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची पाहणी केली. या चमूने मजुरांशी चर्चाही केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात या चमूने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मनरेगाबाबत सादरीकरण करून माहिती दिली. भंडारा जिल्हा हा वेळेत मजुरी देण्यामध्ये राज्यात पहिला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चमूला सांगितले.